January 23, 2022
खेळ

क्रमशःभाग ३,आँलंपीकचा रोमांचक इतिहास

 

ऑलिंपिक क्रीडासामने : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्वराष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी भरविले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले.

प्राचीन काळी संस्कृतीच्या उच्च शिखरावर असलेल्या ग्रीस देशात तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, शिल्प, स्थापत्य, शिक्षण इ. विषयांप्रमाणे शारीरिक शिक्षणावर विशेष भर दिला जात असे. होमरच्या इलियड व ओडिसी या महाकाव्यातील आकिलीझ व युलिसीझ हे नायक अचाट सामर्थ्य, शौर्य, धैर्य इ. गुणांत तसेच कुस्ती, भालाफेक, मुष्टियुद्ध इ. विद्यांत प्रवीण होते, असे वर्णन आहे. ग्रीकांच्या शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षण, आहार व आरोग्यसंवर्धन यांवर विशेष लक्ष दिले जाई.

त्या काळच्या शारीरिक शिक्षणाचा कस पाहण्यासाठी मर्दानी व मैदानी शर्यतींचे सामने मोठ्या प्रमाणावर भरत असत. या सामन्यांत धावणे, भालाफेक, थाळीफेक, शारीरिक कसरती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचा स‌मावेश असे. या विषयांचे शिक्षण देणार्‍या व्यायामशाळा व आखाडे असत.

ग्रीक लोक धार्मिक वृत्तीचे होते. झ्यूस, अपोलो, हमींझ, अथीना, डिमीटर इ. देवदेवतांची पूजा करून त्यांना प्रस‌न्न करून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट असे. या धार्मिक वृत्तीतूनच ऑलिंपियन सामन्यांचा उगम झालेला आहे. हे सामने विविध देवदेवतांच्या उत्सवाप्रीत्यर्थ भरविले जात व त्यांत शरीरसामर्थ्य व कौशल्य यांची कसोटी पाहिली जाई. या सामन्यांचा कालावधी सामान्यत: दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या आसपास चारपाच दिवसांचा असे. हे सामने ग्रीकांचा देवाधिदेव झ्यूस याच्या उत्स‌वार्थ भरत व त्यांत भाग घेणारे तरुण तत्पूर्वी दहा महिने सामन्यांसाठी तयारी करीत असत. पहिल्या दिवशी भाग घेणाऱ्या तरुणांची चाचणी व शपथविधी होई. दुसऱ्या दिवशी रथांच्या शर्यती व घोड्यांच्या शर्यती होत. तिसऱ्या दिवशी पौर्णिमेला झ्यूस देवाला प्रसन्न करण्यासाठी आहुती, बलिदान आदी कार्यक्रम स‌काळी होत व दुपारी युवकांच्या विविध शर्यती होत. चौथ्या दिवशी महत्त्वाच्या मैदानी व मर्दानी शर्यती म्हणजे धावणे, कुस्त्या, मुष्टियुद्ध आदी होत. पाचव्या दिवशी ऑलिव्हच्या पर्णांचा मुकुट घालून विजयी वीरांचा स‌न्मान केला जाई व मेजवान्या होऊन स‌मारंभाची सांगता होत असे.

ऑलिंपिक सामने केव्हा व कसे सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु ऐतिहासिक पुरावा व परंपरा पाहता इ. स‌. पू. ७७६ साली इफिटस या राजाच्या कारकीर्दीत कायदेपंडित लायकरगस याने हे सामने सुरू केले असावेत. तत्पूर्वीही दोनतीन शतके अशाच प्रकारचे पायथियन, नेमियन, इस्थामियन सामने चालू होते, असे होमरच्या इलियड या काव्यातील उल्लेखावरून दिसते. दर चार वर्षांनी भरणाऱ्या या क्रीडामहोत्स‌वात ‘ऑलिंपियड’ ही संज्ञा प्राप्त झाली. हे सामने भरविण्यासाठी वर उल्लेखिलेल्या ऑलिंपिया या वनश्रीयुक्त जागेची योजना होऊन तेथे झ्यूसचे मंदिर बांधण्यात आले व त्यात १२·१९ मी. उंचीचा सुवर्ण, हस्तिदंत व हिरेमाणिकांचा झ्यूसचा पुतळा उभारण्यात आला. त्याच्या स‌भोवती विजयी वीरांचे पुतळे उभारले गेले. मंदिराच्या परिसरात सामन्यांसाठी इमारती, क्रीडांगणे, नाट्यगृह व प्रचंड प्रेक्षागृहही कालांतराने बांधण्यात आले. मुख्य शर्यतीचे मैदान व प्रेक्षागृह फारच भव्य होते. त्यात एका वेळी सु. ५०,०००लोक स‌हज सामावले जात. प्रमुख खेळांच्या शर्यती या प्रेक्षागारामध्येच होत असत. त्याची लांबी १९२ मी. व रुंदी २७·४३ मी. असे. या अंतराला एक ‘स्टेड’ म्हणत व अशा अनेक ‘स्टेड’ अंतरांच्या शर्यती असत. क्रीडांगणावर सामान्यत: भुसभुशीत वाळू पसरलेली असे व भाग घेणारे खेळाडू अनवाणीच धावत असत. शारीरिक कस‌रतींमध्ये संपूर्ण उघड्या शरीराने भाग घ्यावा लागे. त्यामुळे भाग घेणाऱ्या युवकाचे शरीर बांधेसूद आहे किंवा नाही हे स‌मजत असे.

ऑलिंपिक क्रीडासामन्यांत भाग घेणाऱ्या खेळाडूंना सामन्यांपूर्वी १० महिने व्रतस्थ राहून नियमितपणे तयारी केल्याचा दाखला घ्यावा लागे. प्रथमत: फक्त शुद्ध ग्रीक रक्ताच्या ३० वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूसच या सामन्यांत भाग घेता येत असे. सामन्यांच्या प्रारंभी खेळाडूंना आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या स‌मवेत शर्यतीत, ‘स‌चोटीने भाग घेऊ व खेळास कमीपणा आणणारे कोणतेही वर्तन करणार नाही’, अशी शपथ घ्यावी लागे. सामन्यांची व्यवस्था पाहणाऱ्या पंचांनासुद्धा शपथ घ्यावी लागे. प्रारंभी स‌र्व शर्यतींचे निकाल देण्यास एकच पंच असे. कालांतराने शर्यतींची संख्या वाढू लागली व पंचांची संख्याही वाढत गेली. त्या काळच्या सामन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंचांनाही सामन्यात भाग घेता येत असे. परंतु पुढे ही प्रथा बंद करण्यात आली.

सामन्यांचे सुरुवातीस खेळाडू, पंच, नगरपिते, प्रमुख मंत्री, खेळाडूंचे रथ, घोडे व खेळांचे साहित्य यांची मोठी मिरवणूक निघे. अर्वाचीन ऑलिंपिक सामन्यांतील मानवंदना, संचलन इ. पूर्वीच्या मिरवणुकीच्या प्रतिकृतीच होत. सामन्यांत धावण्याच्या शर्यती, उड्यांच्या शर्यती, द्वंद्वे, पाचशर्यती गट (पेंटॅथ्लॉन), घोड्यांच्या शर्यती व रथांच्या शर्यती यांचा स‌मावेश असे. तेविसाव्या ऑलिंपिक सामन्यापासून मुलांकरिताही शर्यती भरविल्या जाऊ लागल्या.

आरंभीच्या काळात विजयी खेळाडूंना मौल्यवान बक्षिसे दिली जात. परंतु स‌हाव्या सामन्यापासून विजयी वीरास सोनेरी व हस्तिदंती विजयपीठावर उभे केले जाई. सोन्याच्या कोयत्याने कापलेल्या पवित्र ऑलिव्ह फांदीचा मुकुट त्याच्या माथ्यावर ठेवून, दूताकडून त्याचा व त्याच्या मातापित्यांचा जयघोष केला जाई. स‌र्व प्रेक्षकही त्याचा जयजयकार करीत. नंतर त्याचे नगरबांधव वाद्ये वाजवून त्याची रथातून मिरवणूक काढीत. कवी व भाट त्याच्या यशाचे गुणगान करीत. त्याचे पुतळे उभारले जात व अशा ऑलिंपिक वीराला राष्ट्रवीर मानले जाई.

ऑलिंपिक सामन्यांतील अजिंक्यपद टिकविण्यासाठी काही खेळाडू फार प्रयत्न करीत. चिओनिस या स्पार्टाच्या खेळाडूने धावण्याच्या शर्यतीत (स्टेड-रेस) तीन वेळा, तर लीऑनिडस या खेळाडूने लागोपाठ चार वेळा विजय मिळविला होता. हार्मोजिनस याने तीन खेळांत मिळून आठ विजय संपादन केले, म्हणून त्यास‌ ‘अश्व’ (हिप्पोज) हे नामाभिधान मिळाले होते. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता पायथॅगोरस याचा शिष्य मायलो याने कुस्तीत सात वेळा अजिंक्यपद मिळविले होते. मॅसिडोनियाचा राजा फिलिप (अलेक्झांडरचे वडील) याने रथाची शर्यत जिंकली होती. रोमन राजा नीरो याने व्यायामी खेळ, नाट्य व संगीत यांत अजिंक्यपदे मिळविली होती.

ग्रीक लोकांच्या या ऑलिंपिक सामन्यांचे उज्ज्वल स्वरूप हळूहळू बदलत गेले. खेळासाठी खेळ, कलेसाठी कला, उत्तम नागरिक वा सैनिक तयार करणे, ही उच्च ध्येये मागे पडून या सामन्यांना खेळांच्या दंगलीचे धंदेवाईक स्वरूप आले. कालांतराने ग्रीक परंपरा नष्ट झाल्या व रोमन लोकांच्या कारकीर्दीत तर सामन्यांना रानटी व हिंस्र स्वरूप प्राप्त झाले. धावण्याच्या व उड्या मारण्याच्या शर्यती, कुस्त्या, द्वंद्वे यांऐवजी घोड्यांच्या व रथांच्या शर्यती सुरू झाल्या व प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करून नामोहरम करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. पुढेपुढे तर मनुष्य व सिंह किंवा वाघ यांसारखी क्रूर श्वापदे यांची रोमांचकारी व हिडीस द्वंद्वे होऊ लागली. तसेच भीमपराक्रमी पहिलवानांची स‌शस्त्र द्वंद्वे होऊ लागली. त्यांत एक खेळाडू संपूर्ण जायबंदी होऊन त्याचा निःपात होईपर्यंत द्वंद्व चालत असे. या सामन्यांतील वीर स‌माजातील पुढाऱ्यांपेक्षाही बलवान झाले व त्यामुळे स‌माजस्थैर्याला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे ३९४ साली त्यावेळच्या थीओडोशियस या रोमन बादशहाने कायद्याने या सामन्यांवर बंदी घातली. अशा रीतीने जगाच्या इतिहासात सु. १२० ०वर्षे अखंड चालणारे हे ऑलिंपिक सामने बंद पडले ते कायमचेच. त्यानंतर सु. १५०० वर्षांनी एकोणिसाव्या शतकात या सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

सआभार इंटरनेट
1. Grombach, J. V. The 1964 Olympic Guide, New York, 1964.
2. Sanyal, Saradindu, Olympic Games and India, Delhi, 1970.
शहाणे, शा. वि.

हर्षद कुलकर्णी
क्रिडा मार्गदर्शक

Related posts

धोनींची निवृत्तीची घोषणा, सचिन तेंडुलकर म्हणतात…

PC News

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना लाठी- काठी चे प्रशिक्षण !

PC News

ऑलम्पिक ची देशाने,शहराने स्वप्न बघताना त्याच्या वस्तुस्थिती वर पण प्रकाश टाकणे आवश्यक आहे

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

त्याने देशाला ‘वर्ल्डकप’ जिंकून दिला मात्र आज करतोय ‘मजुरी’

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

एक टिप्पणी द्या